विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ६६ वाहनांची तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ वाहनांवर श्रीरामपूर पोलिसांची दंडात्मक कारवाई

नियम धाब्यावर बसवणाऱ्या स्कूल बस चालकांवर होणार कडक कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्यास! पोलीस प्रशासनाचा इशारा
श्रीरामपूर:
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातर्फे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर पोलीस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा आणि श्रीरामपूर RTO विभागाच्या संयुक्त सहभागाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ११.०० या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान शाळांच्या बस व इतर वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, विमा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा आणि चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स यासह सर्व सुरक्षा साधनांची कडक तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान एकूण ६६ वाहनांची झाडाझडती घेण्यात आली असून नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चालकाचा युनिफॉर्म नसणे (०६), अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक (०६), फायर बॉटल नसणे (०६), प्रथमोपचार पेटी नसणे (०५), इमर्जन्सी एक्झिट सुस्थितीत नसणे (०३), लायसन्स नॉट कॅरी (०२), फिटनेस नसणे (०२), सेफ्टी काच/जाळी नसणे (०२) आणि पीयूसी नसणे (०१) या बाबींचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याने स्कूल बस चालक, मालक, शाळा प्रशासन व पालकांनी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चौकट:
“नियम मोडल्यास कडक कारवाई; वाहनांची पुन्हा तपासणी होणार!”
“मुलांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालक व मालकांनी योग्य ती खबरदारी घेऊनच मुलांची शाळेत ने-आण करावी. वाहनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मुले नेऊ नयेत, तसेच वाहनांची वेळोवेळी तपासणी करून ती सुस्थितीत ठेवावीत. नियमांचा भंग केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. यापुढे देखील कोणत्याही वेळी पुन्हा वाहनांची अचानक तपासणी करण्यात येईल, त्यामुळे सर्वांनी नियमांत राहूनच विद्यार्थ्यांची ने-आण करावी.”
सोमनाथ वाकचौरे
(अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर विभाग)