श्रीरामपूर उपविभागात कोणतेही गैरकृत्य सहन केले जाणार नाही: अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा सज्जड दम; कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई, २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
श्रीरामपूर / कोपरगाव:
श्रीरामपूर उपविभागाच्या हद्दीत अवैध धंदे तसेच कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे सत्र सुरूच राहील, श्रीरामपूर उपविभागात कोणतेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. त्यांच्या याच विशेष आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा १ जेसीबी व १ टिपर (डंपर) पकडला असून २० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिले होते. या आदेशान्वये गस्त घालत असताना पथकाला मायगाव देवी गावच्या शिवारात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अवैध वाळूचा साठा करून जेसीबीच्या साह्याने डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने कोपरगाव तालुका पोलिसांना सोबत घेऊन दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी जेसीबी चालक किशोर देविदास थोरात (वय २६, रा. मायगाव देवी, ता. कोपरगाव) आणि डंपर चालक सुरेश सुकदेव सोनवणे (वय ३८, रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव) या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. गोदावरी पात्रातून आणलेली वाळू साठवून तिची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिवळ्या रंगाचा जेसीबी (MH 17 DJ 4580), एक टाटा कंपनीचा लाल-पिवळ्या रंगाचा बॉडी असलेला 909HD तसेच (MH 12 SX 2313) आणि ६ ब्रास वाळू असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) आणि पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ३, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाचका पोसई चारुदत्त खोंडे, पोहेकॉ सचिन धानाड, अनिल शेंगाळे, पोकॉ अक्षय भोसले आणि पोकॉ युवराज खुळे यांच्या पथकाने केली.