डीजेमुक्त, व्यसनमुक्त गणेशोत्सवासाठी आदर्श मंडळांना पुरस्कार- पोलीस निरीक्षक प्रताप दराडे.

नेवासे पोलिस व प्रेस क्लबचा संयुक्त उपक्रम; प्रथम क्रमांकास १० हजारांचे बक्षीस
नेवासे शहर ता.१४
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, संस्कार, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी नेवासे पोलिस ठाणे व नेवासे प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने ‘नेवासे आदर्श गणेशोत्सव गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. या उपक्रमातून डीजेमुक्त व व्यसनमुक्त गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या स्पर्धेत नेवासे पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मंडळास १० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धत भाग घेण्यसाठी गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाची परवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे मंडळांची निवड करण्यासाठी एकूण १०० गुणांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये डीजेमुक्त गणेशोत्सवाला सर्वाधिक ३० गुण, प्रशासनाची परवानगी असणे यासाठी १०गुण आदर्श व पर्यावरणपूरक सजावटीसाठी २० गुण, व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी २० गुण, शिस्त व सुरक्षेसाठी १० गुण, स्वच्छता व निर्माल्य व्यवस्थापनासाठी १० गुण देण्यात येणार आहेत. मंडळाच्या परीक्षणासाठी पोलीस प्रशासनाचे पंच म्हणू सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नागरगोजे, गोपनीय अंमलदार भारत बोडके, पत्रकार सुधीर चव्हाण, मोहन गायकवाड, सुहास पठाडे आदींचा समावेश आहे.
ध्वनिप्रदूषणास आळा, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता, आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे, स्वयंसेवकांची नियुक्ती, सीसीटीव्ही व्यवस्था, महिला सुरक्षेची काळजी तसेच मंडप परिसरातील स्वच्छता या बाबींनाही विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन आणि संस्कारांचा केंद्रबिंदू व्हावा, तसेच गणेश मंडळांनी समाजापुढे आदर्श निर्माण करावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बक्षीस पात्र गणेश मंडळांना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते दोन ऑक्टोबर रोजी स्वतंत्र समारंभात बक्षीस वाटप होणार आहे
तरी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुरुप्रसाद देशपांडे अध्यक्ष प्रेस क्लब नेवासे यांनी केले आहे.