नेवासा पोलिसांच्या पाठीशी वरिष्ठ खंबीर; राजकीय दबावाला बळी न पडता काम करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांचे निर्देश

नेवासा पोलिसांच्या पाठीशी वरिष्ठ खंबीर; राजकीय दबावाला बळी न पडता काम करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांचे निर्देश

​नेवासा: कायदा व सुव्यवस्था सांभाळताना प्रामाणिकपणे काम करताना काही चुका झाल्या तरी नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी खंबीरपणे उभे राहतील, असा भक्कम विश्वास नाशिक परि क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी व्यक्त केला. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम करण्याचे निर्देश देत त्यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना एकप्रकारे ‘फ्री हॅन्ड’ दिला आहे.

​विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी गुरुवारी नेवासा पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन संपूर्ण कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या अचानक झालेल्या भेटीमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असली, तरी त्यांनी दाखवलेल्या विश्वासाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) सोमनाथ वाकचौरे आणि पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू उपस्थित होते. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांचे स्वागत केले.

​गेल्या दोन महिन्यांत नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक राजकीय व सामाजिक तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. या संवेदनशील परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घेतलेली कणखर भूमिका आणि परिस्थिती संयमाने हाताळण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असल्याचे येनपुरे यांनी नमूद केले.

​या पाहणीदरम्यान त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. प्रलंबित गुन्हे, गुन्हे तपासाची गती आणि संवेदनशील घटनांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना अनेकदा आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते; अशा वेळी प्रामाणिकपणे आणि निडरपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील नेवासा पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत त्यांनी तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना पूर्ण पाठबळ दिले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनीही नेवासा पोलीस ठाण्याच्या कामाचे कौतुक केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याने आणि दिलेल्या भक्कम पाठबळामुळे नेवासा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!