श्रीरामपूर शहरात मध्यरात्री सोमनाथ वाकचौरे चा मोठा दणका: थत्ते मैदान अन् पोद्दार शाळा परिसरातील मद्यपी, हुल्लडबाजांवर कारवाई; एसपींच्या आदेशाने ३२ जण जाळ्यात

श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):
श्रीरामपूर शहरातील मोकळ्या मैदानांवर रात्रीच्या वेळी ठिय्या मांडून हुल्लडबाजी करणाऱ्या आणि मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी अचानक धडक कारवाई केली. काल रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे , श्रीरामपूर पोलीस निरीक्षक आणि आरसीपी (RCP) पथकाने संयुक्तपणे राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे हुल्लडबाजांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत मद्यपी, विनाकारण बसणारे तरुण आणि नियमबाह्य वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (SP) आणि अप्पर आधीक्षक पोलीस सोमनाथ वाकचौरे यांच्या धडक कृतीचे शहरातील नागरिकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे
.
*थत्ते मैदान आणि पोद्दार शाळा परिसरात धाड*
गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान तसेच महाले पोद्दार शाळेसमोरील क्रिकेट मैदानावर रात्रीच्या वेळी टवाळखोर आणि हुल्लडबाज तरुणांचा वावर वाढला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल रात्री अचानक संपूर्ण मैदानांना वेढा घालून तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान सुमारे ३२ वाहने आणि मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तींवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली.

*गोंधवणीसह बाहेरच्या भागातील तरुणांचा भरणा*
तपासणीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली असून, श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसर तसेच इतर आउटसाईडर एरियामधून अनेक तरुण केवळ गप्पागोष्टी करण्यासाठी अथवा मद्यप्राशन करण्यासाठी या मैदानांवर एकत्र येत असल्याचे निदर्शनास आले. रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबासह किंवा महिलांसह परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि स्थानिक रहिवाशांना या हुल्लडबाजांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

*काळ्या काचांच्या गाड्यांवरही पोलीस गाज*
याच मोहिमेदरम्यान थत्ते मैदानावर संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या दोन फोर-व्हीलर वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही गाड्यांच्या काचांना पूर्णपणे ब्लॅक फिल्म (काळ्या काचा) लावण्यात आल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नागरिकांकडून एसपी अन् पोलिसांचे कौतुक
स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक (SP) यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही धडक मोहीम राबवली. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि महिला व कुटुंबांच्या सुरक्षेसाठी अशी कारवाई पुढेही सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरातील मैदानांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी विनाकारण बसणाऱ्या, मद्यप्राशन करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर आणि सतत कारवाई सुरू राहील.