नेवासा पोलिसांची मोठी कारवाई: ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागून विना नंबरचा डंपर अन्‌ बेकायदेशीर वाळू जप्त; आरोपी गजाआड

नेवासा पोलिसांची मोठी कारवाई: ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागून विना नंबरचा डंपर अन्‌ बेकायदेशीर वाळू जप्त; आरोपी गजाआड


​नेवासा:
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. आज, मंगळवार (दि. ९ जून) रोजी पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी विना नंबरचा डंपर आणि दोन ब्रास वाळूसह २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील परिसरातून अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पो.नि. ढिकले यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस काँस्टेबल सुनील गंगावणे, नारायण डमाळे, सुमित करंजकर, अतुल शेळके आणि परमेश्वर गव्हाळ यांचा समावेश होता.
साडेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी एक विना नंबरचा टाटा कंपनीचा लाल-पांढऱ्या रंगाचा डंपर मिळून आला. पोलिसांनी डंपरसह त्यातील अंदाजे ₹१०,००० किमतीची दोन ब्रास वाळू आणि ₹२,५०,००० किमतीचा डंपर असा एकूण २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
​या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आलेला आरोपी गोविंद बबन मोरे (वय ४० वर्ष, रा. हंडीनिमगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस काँस्टेबल सुनील सर्जेराव गंगावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. एम. सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब, श्री. वैभव कलुबर्मे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव उपविभाग) श्री. निरज राजगुरु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पीएसआय विकास पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार/गणेश नागरगोजे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!