खाकी वर्दीतील संवेदनशीलता! कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी करजगाव येथे विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

नेवासा (प्रतिनिधी): शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) संजय येनपुरे (IPS) यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीचा, प्रेरणादायी आणि थेट संवाद साधला.

विद्यार्थी जीवनात नियमावलीचा अवलंब केल्यास चांगला माणूस घडतो – आयजी संजय येनपुरे
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना संजय येनपुरे म्हणाले, “सुजान नागरिक आणि एक चांगला माणूस घडण्यासाठी विद्यार्थी जीवनातच नियमावलीचा (शिस्तीचा) अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्वतःची नियमावली तयार करून दररोज काय अभ्यास करायचा आणि भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे, याचे नियोजन केले पाहिजे. हाच आपला रोजचा दिनक्रम असायला हवा.”

ते पुढे म्हणाले, “मानवी जीवन हे एकदाच मिळते; त्यामुळे भविष्याचा योग्य वेध घेऊन आपले कार्य करत राहा. आजच्या डिजिटल आणि ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाच्या जमान्यात मोबाईलचा वापर करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. अभ्यासात व्यत्यय येत असेल, तर मोबाईलपासून निश्चित अंतरावर राहा.”
आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन मित्रांचे उदाहरण दिले. सचिन तेंडुलकर हा सतत ध्येयवादी आणि शिस्तप्रिय राहिल्याने त्याने भारतरत्न पुरस्कारापर्यंत मजल मारली, असे सांगत त्यांनी ध्येयावर निष्ठा ठेवण्याचा मोलाचा संदेश दिला. तसेच, जागतिक समीकरणांवर भाष्य करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीं मुळे तिसऱ्या महायुद्धाची निर्माण होत असलेली भीतीही त्यांनी व्यक्त केली.

”महापुरुषांनी आपल्या जीवनमार्गावर चालताना केलेल्या महान कार्यामुळे ते आज अमर झाले आहेत. त्यांच्या विचारांचे आचरण करा; भविष्यात नक्कीच एक उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासोबतच माझ्यासारख्या उच्च पदावर तुम्ही कार्यरत व्हाल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यासपीठ सोडून थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत:
कार्यक्रमादरम्यान संजय येनपुरे यांनी औपचारिकतेच्या भिंती बाजूला सारल्या. व्यासपीठावरून खाली उतरून ते थेट जमिनीवर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगेत जाऊन उभे राहिले आणि मुलांशी थेट गप्पा मारल्या. खाकी वर्दीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हा साधेपणा आणि आपुलकी पाहून विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा गजर करत व ‘व्हिक्ट्री साइन’ (Victory Sign) दाखवून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी संजय येनपुरे यांना विविध विषयांवर थेट प्रश्न विचारले, ज्यांची त्यांनी अत्यंत मार्मिक आणि सोप्या भाषेत उत्तरे दिली.
स्पर्धा परीक्षा आणि करिअरबाबत मोलाचे मार्गदर्शन:
कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांचे स्मरण करत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती दिली. वर्ग ४ च्या पदांपासून ते वर्ग १ च्या पदांपर्यंतच्या विविध परीक्षांचे स्वरूप, तसेच राज्य पातळीवरील व केंद्र स्तरावरील (UPSC) परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. “आयुष्यात काय व्हायचे आहे हे आधीच निश्चित करा आणि नियोजनबद्ध अभ्यास करा,” असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने अभ्यासाच्या नियोजनावर मांडलेल्या विचारांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे, प्रा. रवींद्र जायभाय, प्रा. जगदीश सोनवणे आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल सदस्य किरण कडू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी शेवगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरु, नाशिक आयजी वाचक पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष टेमक, सूर्यभान फुलसौंदर, मुळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत टेमक, नामदेव कंक, संजय कंक, सुहास टेमक, कर्णासाहेब औटी, पानेगावचे माजी सरपंच हौशाबापू जंगले, माजी उपसरपंच डॉ. जयवंतराव गुडधे, कैलास बाचकर, राजेंद्र टेमक, भाऊसाहेब राजगुरु, नानासाहेब पुंड, आशुतोष माकोणे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, दिगंबर माकोणे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बनकर, पर्यवेक्षक वाय. एस. पठाण यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विठ्ठलराव देवखिळे यांनी केले, तर सूत्रसंचालन दुर्गा बिडवे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले.