नेवासा खुर्द येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल!

एसपी मुम्मका सुदर्शन यांच्याकडून तपासाचे थेट सनियंत्रण; आरोपींच्या शोधासाठी एलसीबीसह ४ पथके रवाना


नेवासा (प्रतिनिधी):
नेवासा खुर्द येथील काटे महाराज आश्रम कमानीजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून तलवारी, चॉपर, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) सह महाराष्ट्र पोलीस कायदा व शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी आसिफ शेरु शेख (वय ४०, रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा भाऊ जमील शेरु शेख आणि त्यांचे मित्र सोहेल हरुण शेख व सादिक हमीद शेख हे आपले दुकान बंद करून घरी जात होते.
नेवासा खुर्द येथील काटे महाराज आश्रम कमानीसमोर आरोपींनी Alto कार व मोपेड ॲक्सेस स्कुटीवरून येऊन त्यांना अडवले. “मागील भांडणाच्या वेळी तुम्ही वाचले, आज तुम्हाला आम्ही संपवून टाकू” असे म्हणत आरोपींनी हातातील तलवार, चॉपर, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांनी जमील शेख व त्यांच्या मित्रांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील आत्मादीप हॉस्पिटल आणि अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आरोपींची नावे:
फिर्यादी आसिफ शेरु शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे:
१. राम संजय शिरसाठ (रा. संभाजी नगर, नेवासा खुर्द)२. लखन संजय शिरसाठ ३. आदित्य उर्फ पांड्या कानगरे ४.आरीफ उर्फ बली पठाण ५. आकाश उर्फ अक्षय चक्रनारायण ६.अनुज उर्फ याकुब अनिल चांदणे
७. यश संदीप चांदणे ८.तसेच त्यांच्यासोबत असलेले ४ ते ५ अनोळखी मित्र.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना; शोधासाठी ४ पथके तैनात

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले असून, ते स्वतः या घटनेवर व तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) दोन पथके आणि नेवासा पोलिसांची दोन पथके अशी एकूण ४ विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार आणि पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन तपासाची पाहणी केली.
नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), १८९(२), १९०, १९१(२), (३), ३५१(२) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ व शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करत आहेत.

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही; आरोपींना लवकरच अटक करू! – पो.नि. प्रताप दराडे
> “नेवासा खुर्द येथील मारहाणीची घटना अत्यंत गंभीर असून यातील एकाही आरोपीला सोडले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली असून सर्व संशयितांना लवकरच गजाआड केले जाईल. परिसरात शांतता ठेवावी, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
— प्रताप दराडे

(पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस ठाणे)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!