माणुसकीचा नवा आदर्श! ‘नावातच नाथ, अनाथांचे नाथ’ ही म्हण सार्थ ठरवत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अनाथ मुलीस घेतले दत्तक; अर्धी संपत्ती केली नावे

माणुसकीचा नवा आदर्श! ‘नावातच नाथ, अनाथांचे नाथ’ ही म्हण सार्थ ठरवत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अनाथ मुलीस घेतले दत्तक; अर्धी संपत्ती केली नावे

श्रीरामपूर:

कर्तव्याची कठोरता आणि अंतकरणातील करुणेचा एक अद्वितीय संगम श्रीरामपूर (उत्तर नगर) विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांच्या रुपाने पाहायला मिळाला आहे. ‘नावातच नाथ, अनाथांचे नाथ’ ही म्हण त्यांनी आपल्या कृतीतून तंतोतंत सार्थ करून दाखवली आहे. अवघ्या २१ दिवसांच्या स्वतःच्या चिमुकलीला गमावल्यानंतर, एका अनाथ मुलीस दत्तक घेऊन तिच्या नावे आपली अर्धी संपत्ती करत त्यांनी समाजासमोर मानवतेचा एक नवा वस्तूपाठ घालून दिला आहे.

दुःखावर मात करत उभारला वात्सल्यसिंधू

मिळालेल्या माहितीनुसार, श्री. वाघचौरे हे भुसावळ (जि. जळगाव) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून कार्यरत असताना, त्यांची मुलगी अवनी ही दुर्धर आजारामुळे अवघ्या २१ दिवसांची असताना दगावली. या दुःखाचा प्रचंड मानसिक धक्का वाघचौरे परिवाराला बसला. मात्र, या दुःखात खचून न जाता त्यांनी एका अनाथ बालिकेला दत्तक घेण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला.

मुलीचे नाव ठेवले ‘अवनी’, दिली अर्धी संपत्ती

दत्तक विधान नियमानुसार पार पाडल्यानंतर त्यांनी त्या मुलीचे नावही आपल्या दिवंगत कन्येच्या आठवणीत ‘अवनी’ ठेवले. एवढेच नव्हे, तर तिला स्वतःच्या पोटच्या लेकीप्रमाणे सांभाळताना आपल्या एकूण संपत्तीपैकी अर्धी संपत्ती तिच्या नावे करून कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

कर्तव्यातही जाणवतेय तीच करुणा

या कौटुंबिक घटनेतील करुणेचा प्रभाव त्यांच्या पोलीस कामकाजातही स्पष्टपणे दिसून येतो. पळून गेलेल्या अथवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेताना आणि त्यांना सुरक्षित घरी पोहोचवताना अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे हे विशेष संवेदनशीलतेने काम करत असतात. त्यांच्या या धडपडीमुळे अनेक कुटुंबांचे दुःखाश्रू पुसले गेले आहेत. खाकी वर्दीतील एका पोलीस अधिकाऱ्याचे हे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!