सीलबंद बाटलीत पाण्याऐवजी ‘ॲसिड’!; दोन घोट पिताच तरुणी मृत्यूच्या दारात, ब्रँडेड पाण्याच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

**सीलबंद बाटलीत पाण्याऐवजी ‘ॲसिड’!; दोन घोट पिताच तरुणी मृत्यूच्या दारात, ब्रँडेड पाण्याच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह**


**विशेष प्रतिनिधी, हापूर (उत्तर प्रदेश)**
बाजारातून विकत घेतलेल्या आणि पूर्णपणे पॅक असलेल्या मिनरल वॉटरच्या बाटलीत चक्क ॲसिड (आम्ल) आढळल्याची एक अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर येथे घडली आहे.  नामांकित ब्रँडची सीलबंद बाटली असूनही, त्यातील पाण्याचे अवघे दोन घोट पिताच एका २२ वर्षीय तरुणीची प्रकृती कमालीची बिघडली आहे. तिला तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
या घटनेने “ब्रँडेड आणि सीलबंद म्हणजे शंभर टक्के सुरक्षित” या विश्वासाला मोठा तडा दिला असून, ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपन्यांच्या कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
**दागिने खरेदी करताना घडला थरार**
मिळालेल्या माहितीनुसार, हापूरमधील अर्जुन नगर परिसरात राहणारी रिया ही तरुणी तिच्या आईसोबत जवळच्याच एका सराफाच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी गेली होती. दुकानदाराशी चर्चा सुरू असताना रियाला अचानक तीव्र तहान लागली. सराफाने ग्राहक देवो भव: या नात्याने तात्काळ शेजारील जनरल स्टोअरमधून ‘ नामांकित ‘ कंपनीची पूर्णपणे सीलबंद आणि थंड पाण्याची बाटली मागवून दिली.
 **दोन घोट घेतले अन् तोंडातून निघू लागल्या ज्वाला!**
बाटली पूर्णपणे पॅक असल्याने रियाने ती विश्वासाने उघडली आणि पाण्याचे दोन घोट घेतले. मात्र, पाणी घशाखाली उतरताच रिया वेदनेने किंचाळली. तिच्या पोटात आणि घशात तीव्र आग होऊ लागली, उलट्या सुरू झाल्या आणि ती जागीच कोसळली. बाटलीत पाणी नसून काहीतरी रासायनिक द्रव (ॲसिड) असल्याचे उपस्थितांच्या तात्काळ लक्षात आले. रियाची प्रकृती झपाट्याने खालावल्याने तिला तातडीने मेरठ येथील नामांकित रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
** नामांकित कंपनीच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह!**
पिण्याच्या पाण्याच्या बाजारपेठेत नामांकित कंपनीचे पाणी बॉटल हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. अनेकदा रेल्वे प्रवास, हॉटेल किंवा खरेदी दरम्यान आपण डोळे झाकून या ब्रँडवर विश्वास ठेवतो. मात्र, हापूरमधील या घटनेने एका नामांकित कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग प्लांटमधील गुणवत्तेचे वाभाडे काढले आहेत.
* सीलबंद बाटलीमध्ये ॲसिडसारखा प्राणघातक पदार्थ पोहोचलाच कसा?
* प्लँटमधील ऑटोमेशन आणि क्वॉलिटी चेकिंग (Quality Control) यंत्रणा काय झोपा काढत होती का?
* हा प्रकार बनावट (Duplicate) नामांकित बाटल्यांच्या रॅकेटमुळे घडला की कंपनीच्या निष्काळजीपणामुळे?
असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत असून, स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून जप्त केलेली बाटली फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली आहे.
 **ग्राहकांनो सावधान! सीलबंद बाटली घेताना ‘ही’ काळजी नक्की घ्या:**
हापूरमधील घटना पाहता, आता बाजारातील कोणत्याही पाण्याच्या बाटलीवर आंधळा विश्वास ठेवणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे पाणी पिताना खालील गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य झाले आहे:
**सील आणि पॅकेजिंग नीट तपासा:** बाटलीचे सील पूर्णपणे लॉक आहे की नाही हे पहा. अनेकदा जुन्या बाटल्यांमध्ये स्थानिक पाणी किंवा केमिकल्स भरून ते ‘फेविक्विक’ किंवा मशीनच्या साहाय्याने पुन्हा सील केले जाते.
* **वास आणि रंगाची परीक्षा:** बाटली उघडल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. पाण्यातून कोणताही उग्र वास येत नाही ना, किंवा पाण्याचा रंग नेहमीसारखा पारदर्शक आहे ना, याची खात्री करा.
* **पहिला घोट घेताना सतर्कता:** पाणी पिताना एकदम मोठा घोट घेण्याऐवजी आधी अगदी छोटा घोट जिभेवर ठेवून चव तपासा. थोडी जरी वेगळी किंवा जळजळणारी चव लागल्यास पाणी ताबडतोब थुंकून टाका.
* **बनावट ब्रँड्स ओळखा:** बाजारात ‘ अनेक नामांकित कंपन्यांच्या  नावाशी मिळतेजुते असणारे असे बनावट ब्रँड्स विकले जातात. खरेदी करताना मूळ स्पेलिंग आणि ब्रँडचा लोगो नीट तपासा.
> **”या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून (FSDA) युद्धपातळीवर सुरू आहे. दोषी दुकानदारासह संबंधित पाणी पुरवठा साखळीतील प्रत्येकाची चौकशी केली जाईल.”**
> — स्थानिक पोलीस प्रशासन, हापूर
>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!