नेवासा फाटा आठवडे बाजारात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले; पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी

नेवासा फाटा आठवडे बाजारात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले; पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी


गोरगरीब शेतकऱ्यांच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी साध्या गणवेशातील पोलीस तैनात करण्याची गरज; पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन.
**नेवासा (विशेष प्रतिनिधी):** नेवासा फाटा येथील गुरुवारच्या प्रसिद्ध आठवडे बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने या बाजारात विशेष लक्ष देऊन बंदोबस्त देऊन चोरांच्या मुसक्या आवळण्याची  मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणारे गोरगरीब कुटुंब, शेतकरी आणि कष्टकरी लोक आपल्या दैनंदिन गरजांसाठी आणि शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी नेवासा फाटा येथील आठवडे बाजारात येत असतात. मात्र, या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे दुचाकींवर डल्ला मारत आहेत. कालच (दि. ९ जुलै) बाजारात आलेल्या मक्तापूर येथील बाळासाहेब बन्सीलाल गायकवाड (वय २६) या तरुणाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH.17.CS.6199, किंमत रु. ३५,०००/-) अज्ञात चोराने भेळ च्या दुकानाच्या पाठीमागून चोरून नेली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यावर तातडीने तपास करत आहेत.
**सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान**
आठवडे बाजारात येणारे बहुतांश नागरिक अत्यंत गरीब पार्श्वभूमीचे असतात. अनेक जण पोटाला चिमटा काढून किंवा कष्टाची पुंजी साठवून आपल्या प्रवासासाठी व शेतीच्या कामासाठी दुचाकी खरेदी करतात. अशा परिस्थितीत कष्ट करून कमावलेली गाडी चोरीला गेल्यामुळे गरीब कुटुंबांचे कंबरडे मोडते आणि त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळते. या वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार होत आहे.
**साध्या गणवेशात पोलीस तैनात करण्याची मागणी**
या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चोरांना चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारात साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी होत आहे. साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गर्दीमध्ये गस्त घालत असल्यास संशयास्पद हालचाली करणाऱ्या चोरांना रंगेहात पकडणे सोपे होईल. पोलीस प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, जेणेकरून गोरगरीब शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच नागरिकांनीही आपल्या गाड्यांचे लॉक व्यवस्थित तपासावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!