नेवासा नगरपंचायत वाद: मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीत ‘फिल्मी’ ट्विस्ट; ‘गोळीबार’ की ‘राजकीय बनाव’? नेवासकरांचा सवाल**

**नेवासा | प्रतिनिधी:**
नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत ‘गोळीबाराचा’ उल्लेख केल्याने खळबळ उडाली असली, तरी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला मूळ अर्ज, पोलिसांतील फिर्याद आणि प्रत्यक्ष घटनाक्रम यातील विसंगतीमुळे आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आणि मुख्याधिकाऱ्यांच्या हेतूवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
**तक्रारीतील ‘ती’ मोठी तफावत: धमकी की गोळीबार?**
मुख्याधिकाऱ्यांनी सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अर्जात केवळ संशयित संजय सुखदान यांनी **शिवीगाळ करून ‘बघून घेण्याची’ धमकी दिली** असा उल्लेख केला होता. मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात (अहिल्यानगर) फिर्याद दाखल करताना या घटनेला ‘फिल्मी’ वळण मिळाले. सुखदान यांनी रिव्हॉल्व्हरमधून दोनदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, एक गोळी हुकली आणि दुसऱ्यांदा ट्रिगर अडकला, असा खळबळजनक दावा फराटे यांनी फिर्यादीत केला आहे. या विसंगतीमुळे “पत्रात गोळीबाराचा उल्लेख का नाही?”आणि “फक्त संरक्षणासाठी वाढीव कलमे लावली गेली का?” अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.
बदलीचे राजकारण:** पोलीस निरीक्षक पाटील यांची बदली नगरपंचायतीतील वादाची किनार धरून तर झाली नाही ना?
मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. असल्याचे बोलले जात आहे मात्र, नेवासा व्यापारी असोसिएशन आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मते, जो गुन्हा घडलाच नाही, त्या दबावापोटी अधिकाऱ्याचा बळी दिला गेला तर नाही ना? नेवासकर विचारत आहेत की, गोळीबार झालाच कुठे? राजकीय नेत्यांच्या मनधरणीसाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला जात आहे का?
**नेवासा शहर कडकडीत बंद; व्यापारी आणि नागरिकांचा मोर्चा**
मुख्याधिकाऱ्यांचा दावा खोटा असल्याचे सांगत नेवासा व्यापारी असोसिएशनने शहर कडकडीत बंद ठेवून पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. “खोलेश्वर मंदिर परिसरात गोळीबाराची कोणतीही घटना घडली नाही. सुखदान यांनी मुख्याधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने त्यांना अडकवण्यासाठी हा बनाव रचला आहे,” असा आरोप व्यापारी असोसिएशनचे कुणाल मांडण यांनी केला आहे.
> **प्रशासकीय पेच: उपस्थित होणारे कळीचे प्रश्न**
> * **वेळ का लागला?:** क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला ८ दिवस का लागतात?
> * **तांत्रिक पुरावे काय सांगतात?:** पोलीस सूत्रांनुसार, घटनेच्या वेळी मुख्याधिकाऱ्यांना घोडेगावपर्यंत पोलीस एस्कॉर्ट (संरक्षण) देण्यात आले होते, मग गोळीबाराची धाडसी घटना घडलीच कशी?
> * **बदलीचे राजकारण:** पोलीस निरीक्षक पाटील यांची बदली नगरपंचायतीतील वादाची किनार धरून तर झाली नाही ना?
>
**तपास आता तांत्रिक पुराव्यांवर**
सध्या या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा तपास पूर्णतः सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांवर आधारित असेल. सत्य लवकरच समोर येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात आहे.
**संतांची भूमी बदनाम!**
राजकारण आणि अधिकारी यांच्यातील या ‘कलगीतुऱ्यामुळे’ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. “विकास कधी साधणार?” हा प्रश्न आता नेवासा शहरासाठी अनुत्तरीतच आहे.
**”न्याय निवाडा करताना शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. जो गुन्हा घडलाच नाही, त्याचा बाऊ करून शहराची प्रतिमा डागाळली जात आहे.”** — *नेवासकर नागरिक*