*बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईची मागणी*
*खामगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बँकर्स क्लब, संगमनेरचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*

नेवासे शहर ता.३१
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत ३० जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत बँकर्स क्लब, संगमनेरच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी बँक कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. बँकेचा कर्मचारी हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच असतो परंतु काही समाजकंटक मात्र या गोष्टीचा दुरुपयोग करताना दिसत आहे. काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे सामान्य नागरिकांचे अडचण होत असते, परंतु त्यावरही बँकेची कर्मचारी वेळोवेळी नागरिकांच्या समस्या दूर करण्याचे काम करत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमक्या, दादागिरी अथवा मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा घटनांमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्याचा परिणाम बँकिंग सेवांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खामगाव येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बँकर्स क्लबच्या वतीने करण्यात आली. तसेच बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. बँक शाखांमध्ये भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बँकर्स क्लबच्या वतीने वैभव कदम, अरविंद कचरे, हर्षद पाबळकर, निलेश नवले आदी तसेच सदर घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे शाखाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा बँकर्स क्लब, संगमनेरच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
चौकट :- बुलढाणा, खामगाव येथील घटनेचा निषेध तर आहेच पण शेतकरी वर्गाला देखील आव्हान करतो की पात्र शेतकऱ्यांना कुठल्याहि परिस्थितीत लाभ हा मिळणार आहे आणि त्यासाठी कुणाच्या शिफारशीची आवश्यकता नाही. सर्व पद्धत ही पारदर्शक पध्दतीने राबवली जाते. विनाकारण तणाव उत्पन्न होईल अश्या प्रकारची घटना घडेल अशी गोष्ट करू नये. तुम्हाला सेवा देण्यासाठी आमची मानसिक स्थिती चांगली ठेवली तर आम्ही ही प्रक्रिया अजुन जलद आणि चांगल्या पद्धतीने राबवू. फक्त कुणाचे चुकीचे ऐकून ताणतणाव होईल अशी परिस्थिती तयार करू नका. -वैभव कदम (SBI व्यवस्थापक)