नेवासा फाट्यावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; देहविक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून ११ महिलांची सुटका

**नेवासा फाट्यावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; देहविक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून ११ महिलांची सुटका**
**जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले**


**नेवासा (प्रतिनिधी):**
नेवासा फाटा परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरोधात पोलिसांनी शनिवारी (९ मे) रात्री मोठी मोहीम राबवत तीन प्रसिद्ध हॉटेल्स आणि लॉजवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह १० जणांविरुद्ध ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ११ पीडित महिलांची सुटका करण्यात आली *आहे.
*नेवासा फाटा बनले होते अनैतिक व्यवसायाचे हब*
नेवासा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेलबरोबरच लॉजिंगचे पेव फुटल्यानंतर गेल्या काही वर्षांत अनैतिक व्यवसायांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत होते. शेकड्यानी महिलांनी या अनैतिक व्यवसायाच्या निमित्ताने या परिसरातील लॉजिंग व्यावसायिकांशी संधान साधले होते. त्यामुळे नेवासा फाटा परिसर वेश्या व्यवसायाचे ‘हब’ बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन लांबलांबून आंबट शौकीनांची गर्दी होत असल्याने या परिसराला दररोजच जत्रेचे स्वरुप येत होते.
*ग्रामस्थ आणि विद्यार्थिनींना होता मनस्ताप*
व्यसनी, रंगेल लोकांचा कायम राबता वाढल्याने ग्रामस्थ, प्रवासी महिला व विद्यार्थीनींना याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र या माध्यमातून दिवसाकाठी मोठे अर्थकारण फिरत असल्याने तसेच लॉज व्यावसायिक सर्वच यंत्रणा मॅनेज करत असल्याने वेळोवेळी तक्रारी करुनही यावर कारवाई होत नव्हती.

याबाबतची माहिती प्रत्यक्ष जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी स्वतःची यंत्रणा वापरुन नेवासा फाट्यावरील या अनैतिक व्यवसायाची इत्तंभूत माहिती काढली. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय नेवासा फाटा परिसरात फोफावलेला असल्याने एकाचवेळी सर्वत्र छापे टाकण्यासाठी एकाच पोलीस ठाण्यातील उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विसंबून चालणार नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी नेवासा , शेवगांव पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके बनवत सापळा रचला.

**अशी झाली कारवाई**
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना नेवासा फाटा येथील लॉजमध्ये महिलांकडून बळजबरीने देहविक्री करवून घेतली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव व नेवासा पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी तिरंगा लॉज, मित्रप्रेम आणि नामगंगा लॉजवर बनावट ग्राहक (डमी कस्टमर) पाठवून माहितीची खात्री केली. डमी ग्राहकांचा इशारा मिळताच पथकाने तिन्ही ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली. यावेळी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनैतिक व्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले.
**यांच्यावर झाला गुन्हा दाखल**
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) च्या विविध कलमान्वये गुन्हा (रजि. नं. ३६३/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
* **तिरंगा हॉटेल:** मालक प्रकाश शेंडगे व मॅनेजर इक्बाल मंडाल.
* **मित्रप्रेम हॉटेल:** मालक सचिन कोळेकर व मॅनेजर सुरेश कांबळे.
* **नामगंगा हॉटेल:** मालक अजय कोळेकर व मॅनेजर अजित बर्डे.
* **ताब्यात घेतलेले ग्राहक:** अमोल पारखे, दीपक शिंदे, प्रणव नजन आणि दीपक वांदेकर.
**अकरा महिलांची सुटका**
कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. सुटका करण्यात आलेल्या ११ पीडित महिलांना पुढील प्रक्रियेसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सागर ढिकले, सपोनि रामहरी खेडकर, अमोल पवार, विकास पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!