**नेवासा पोलीस ठाण्यात ‘कंपनी चालका’ची मनमानी; ‘चेहरा पाहून’ ड्युट्या लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी!**

**नवीन पोलीस निरीक्षक ढिकले साहेब तात्काळ बदल करणार का? पोलीस वर्तुळात ‘खमंग’ चर्चा**


**नेवासा:**
नेवासा पोलीस ठाण्यातील अंतर्गत कारभार सध्या चांगलाच चव्हाट्यावर आला असून, येथील ‘कंपनी चालक’ (ड्युटी लावणारे अंमलदार) यांच्या मनमानी आणि पक्षपाती कारभारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच आता अंतर्गत ‘वजन’ आणि ‘चेहरा पाहून’ ड्युट्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, पोलीस वर्तुळात याची जोरदार आणि खमंग चर्चा रंगली आहे.
**’नियम’ बाजूला, ‘चेहरा’ बघून ड्युटी!**
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, नेवासा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन ड्युट्यांचे नियोजन करणाऱ्या कंपनी चालकाकडून ठराविक कर्मचाऱ्यांनाच सोयीच्या आणि ‘अर्थपूर्ण’ जागांवर नियुक्त्या दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरी मात्र सलग कष्टाच्या आणि त्रासाच्या ड्युट्या पडत आहेत. हा दुजाभाव करताना कोणताही सेवाज्येष्ठतेचा किंवा नियमांचा विचार केला जात नसून, फक्त ‘वरकमाई’ आणि ‘मर्जी’ सांभाळणाऱ्यांनाच झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
**कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस आणि नाराजी**
या पक्षपाती कारभारामुळे २४ तास ऑन ड्युटी राहून जनतेची सेवा करणाऱ्या सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. “आम्हीही पोलीस दलाचेच घटक आहोत, मग आमच्यासोबतच असा दुजाभाव का?” असा संतप्त सवाल नाव न सांगण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या अंतर्गत राजकारणामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून, याचा थेट परिणाम पोलीस ठाण्याच्या कामकाजावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
**…तर ढिकले साहेब तात्काळ ‘बदली’ करणार का?**
नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच हाती घेतलेले धडाडीचे **पोलीस निरीक्षक सागर ढिकले साहेब** यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ढिकले साहेब हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जातात. त्यामुळे पोलीस ठाण्यातील हा ‘ड्युटीचा बाजार’ आणि मनमानी कारभार ते मोडीत काढणार का, हा मोठा प्रश्न आहे.
> **पोलीस वर्तुळातील खमंग चर्चा:**
> “साहेब, या मर्जीतील कंपनी चालकाला तात्काळ नारळ देऊन, त्याच्या जागी एखाद्या कार्यक्षम आणि निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करणार की जुनीच री ओढली जाणार?” अशी उघड चर्चा आता पोलीस ठाण्याच्या आवारात रंगू लागली आहे.
>
आता पोलीस निरीक्षक ढिकले साहेब या गंभीर प्रकारात स्वतः लक्ष घालून, कर्मचाऱ्यांमधील ही नाराजी दूर करण्यासाठी संबंधित कंपनी चालकाची अन्यत्र तात्काळ उचलबांगडी करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!