*त्या पोलीस निरीक्षकाचा नेवासाचा ‘मोह’ सुटेना! स्थानिक आमदारांच्या भेटीमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात उलट सुलट चर्चा*

*त्या पोलीस निरीक्षकाचा नेवासाचा ‘मोह’ सुटेना!
स्थानिक आमदारांच्या भेटीमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात उलट सुलट चर्चा*

**वरिष्ठांचे आदेश डावलल्याने बदलीचा दणका; चौकशी सुरू असतानाही नेवासासाठी फिल्डिंग?**
**नेवासा (विशेष प्रतिनिधी):**
आपल्या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे आणि ‘मनमानी’ कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले नेवासाचे एक माजी पोलीस निरीक्षक महाशय यांची अखेर बदली झाली खरी, मात्र त्यांचा नेवासाचा मोह अजूनही सुटलेला नसल्याचे चित्र आहे. नुकतीच त्यांनी स्थानिक आमदारांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा नेवासा तालुक्यात सुरू असून, बदली झालेली असतानाही पुन्हा नेवासालाच येण्यासाठी ते आग्रही का? नेवासामध्ये असे नेमके काय आहे? असे अनेक खमंग प्रश्न आता नागरिक आणि राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.
**वरिष्ठांची नाराजी आणि थेट विशेष महानिरीक्षकांकडे अहवाल**
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, ते पोलीस निरीक्षक महाशय हे कर्तव्यावर असताना अनेकदा वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत असत. वरिष्ठांनी वारंवार सूचना देऊनही आपल्याच मनमानी पद्धतीने कारभार चालवणे त्यांना महागात पडले आहे. त्यांच्या या ‘फ्री स्टाईल’ कारभारामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी अत्यंत नाराज होते. अखेर त्यांच्या या वर्तणुकीबाबतचा सविस्तर नाराजीचा अहवाल थेट पोलीस विशेष महानिरीक्षक (IG)यांच्याकडे पाठवण्यात आला होता. वरिष्ठांचे न ऐकणे आणि शासकीय नियमांना बगल देणे, याच कारणांमुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
**विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी सुरू**
केवळ बदलीवरच हे प्रकरण थांबलेले नाही. सदर महाशयांची यांच्या कार्यकाळातील काही वादग्रस्त निर्णय आणि वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत उच्चस्तरीय चौकशी देखील सुरू आहे. एकीकडे खात्यांतर्गत गंभीर चौकशीचे चक्र सुरू असताना, दुसरीकडे मात्र हे महाशय पुन्हा नेवासा पोलीस ठाण्याची कमान मिळवण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे.
**आमदारांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण**
बदलीचे आदेश झालेले असताना आणि वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतली असतानाही, सदर पोलीस निरीक्षक यांनी नुकतीच स्थानिक आमदारांची घेतलेली भेट सध्या तालुक्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. शासकीय नियमांनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी किंवा पोस्टिंगसाठी राजकीय दबाव आणणे गैर मानले जाते. असे असतानाही चालू चौकशीच्या काळात आमदारांची भेट घेऊन पुन्हा नेवासाला येण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात असल्याने, पोलीस वर्तुळातूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.

🛑 **आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिला भेटीचा दुजोरा; पण…**

>> या संपूर्ण प्रकरणाबाबत नेवासाचे **आमदार विठ्ठलराव लंघे पाटील** यांच्याकडे थेट विचारणा केली असता, त्यांनी सदर भेटीबाबत माहिती देताना सांगितले की, **”मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मला सार्वजनिक जीवनात कोणीही भेटू शकते. परंतु, सदर पोलीस निरीक्षक हे मला स्पेशल (विशेष) भेटलेले नाहीत. एका सार्वजनिक कार्यक्रमात आमची भेट झाली होती, या व्यतिरिक्त त्यांची आणि माझी कोणतीही वैयक्तिक भेट किंवा चर्चा झालेली नाही.”** आमदारांच्या या खुलाशानंतरही तालुक्यातील वर्तुळातील चर्चा मात्र थांबायला तयार नाहीत.

> **पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!**
> आता या संपूर्ण प्रकरणात **पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन** काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलीस अधीक्षक सुदर्शन हे बदल्यांमध्ये संबंधित पोलीस निरीक्षकांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ तपासून तसेच त्यांचा मागील कार्यकाळ कसा राहिला, याचा सखोल अभ्यास करून बदली करणार का? राजकीय वजनावर उड्या मारणाऱ्या अशा ‘फिल्डिंग बहादरांना’ मोक्याची पोलीस स्टेशनं न देता, इतरही प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कामाची योग्य संधी देतील का? हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
>
**नेवाशात असं आहे तरी काय?**
पोलीस खात्यात अनेक महत्त्वाची आणि मोठी पोलीस ठाणी असताना, वादग्रस्त ठरलेले अधिकारी पुन्हा पुन्हा नेवासालाच येण्यासाठी एवढे आग्रही का असतात? या मागे नेमके काय गुपित आहे? अशी जाहीर चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे. वरिष्ठांचा रोष पत्करून आणि थेट विशेष महानिरीक्षकांची चौकशी पाठीमागे लागलेली असतानाही नेवासाचा हा ‘मोह’ सुटत नसल्याने, या संपूर्ण प्रकरणाची खमंग चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!