नेवासा पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची ‘धडक’ कामगिरी; लोकसहभागातून संपूर्ण नेवासा शहर आणि नेवासा फाटा सीसीटीव्हीच्या नजरकैदेत!

नेवासा, प्रतिनिधी:
नेवासा शहर आणि नेवासा फाटा परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळलेला होता. मात्र, नुकतेच हजर झालेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या खास पोलीस कौशल्याचा वापर करत, लोकसहभागातून या संपूर्ण परिसराला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भक्कम सुरक्षेचे कवच मिळवून दिले आहे. त्यांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद नियोजनामुळे आता संपूर्ण नेवासा परिसर सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याच्या थेट नियंत्रणाखाली आला आहे.
टोलवाटोलवीला पूर्णविराम; दराडेंचा थेट पुढाकार
यापूर्वी नेवासा शहरात सीसीटीव्ही बसवण्यावरून केवळ राजकारण आणि टोलवाटोलवी पाहायला मिळत होती. पोलीस प्रशासन हा विषय नगरपरिषदेवर ढकलायचे, तर नगरपरिषद पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवायची. यापूर्वी अनेक पोलीस निरीक्षक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि नगराध्यक्ष आले आणि गेले; परंतु प्रत्यक्षात सुरक्षेच्या दृष्टीने असे ठोस नियोजन कोणालाही करता आले नाही. नेवासा शहराच्या सुरक्षेची जिम्मेदारी घेण्यास कोणीही गंभीर नव्हते.
> “केवळ प्रशासकीय कागदपत्रांवर अवलंबून न राहता, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी नेवासातील जनतेमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या एकाच आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”
>
महत्त्वाचे चौक आणि परिसर हायटेक
लोकसहभागातून बघता-बघता नेवासा शहरातील आणि फाट्यावरील मुख्य आणि संवेदनशील ठिकाणे सुरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने गणपती चौक, बस स्टँड परिसर, पंचायत समिती परिसर, नगरपरिषद परिसर तसेच नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौक या विविध ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
थेट मोबाईलवर नियंत्रण; गुन्हेगारांचे धाबे दणाणले
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संपूर्ण कव्हरेज पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्वतःच्या मोबाईलवर घेतले आहे. ते स्वतः अत्यंत बारकाईने नेवासा शहर आणि फाटा परिसरातील हालचालींवर २४ तास नजर ठेवून आहेत. यामुळे शहरातील टवाळखोर, चोऱ्या आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार असून गुन्हेगारांचे धाबे पार दणाणले आहेत.
🛑 चौकट
> ‘नागेबाबा’ संस्थेचे सहकार्य मोलाचे; गुगल बॅकअप अन् क्लाउडमुळे यंत्रणा झाली अभेद्य!
> “मी जेव्हा नेवासाकरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले, तेव्हा ‘नागेबाबा’ सारख्या अग्रगण्य संस्थेने तात्काळ पुढे येत अत्यंत मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हे कॅमेरे अत्यंत ‘हायटेक’ असून ते थेट सोलर सिस्टीमवर चालतात; त्यामुळे भविष्यात वीज (लाईट) असो वा नसो, कॅमेऱ्यांचे काम अविरत सुरू राहील.
> या कॅमेऱ्यांचा एक्सेस पूर्णपणे गुगल बॅकअप आणि मोबाईलवर कनेक्टेड असून सर्व डेटा क्लाउडवर सुरक्षितपणे स्टोअर होतो. विशेष म्हणजे, जर कोणी हे कॅमेरे चोरण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीही शेवटच्या सेकंदापर्यंतचे रेकॉर्डिंग क्लाउड स्टोरेज मार्फत पोलिसांना तात्काळ उपलब्ध होईल. भविष्यातही शहरातील इतर अनेक ठिकाणी कॅमेरे बसवायचे असून नागरिकांनी अशाच प्रकारे पुढे येऊन सहकार्य करावे.”
> — प्रताप दराडे (पोलीस निरीक्षक, नेवासा)
>
🛑 चौकट
> शहराचं दायित्व घ्यायला ‘मोठं काळीज’ लागतं!
> “शहरात काय चाललंय याच्याशी आम्हाला काय देणं-घेणं, अशी उदासीन भूमिका घेणारे अधिकारी आम्ही आजवर खूप पाहिले. केवळ ‘खाकी’ वर्दी घालून नोकरी करायची म्हणून अनेक जण येतात आणि जातात. पण, नागरिकांच्या सुरक्षेची खरी तळमळ असणे आणि संपूर्ण शहराचं दायित्व स्वतःच्या खांद्यावर घेणे, यासाठी पैशांपेक्षा खूप ‘मोठं काळीज’ लागतं!*
> जे काम वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेला जमले नाही, ते दराडे साहेबांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या काही दिवसांत करून दाखवले. नेवासाकरांना आता खऱ्या अर्थाने एक हक्काचा ‘रक्षक’ मिळाला असून आम्ही त्यांच्या या उपक्रमाचे जाहीर स्वागत करतो.”
> — एक जागरूक नागरिक, नेवासा शहर.
>
पुढील टप्प्यात शाळा-कॉलेजेस आणि औद्योगिक वसाहतींवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी
पोलीस निरीक्षक दराडे यांच्या या सुरक्षिततेच्या पॅटर्नचे स्वागत करत असतानाच, नेवासातील सुजाण नागरिकांनी पोलिसांकडे एक अत्यंत महत्त्वाची भावना व्यक्त केली आहे. शहराचा मुख्य भाग आणि चौक आता तिसऱ्या डोळ्याच्या निगराणीखाली आले असले, तरीही शहरातील सर्व नामांकित शाळा, महाविद्यालये (कॉलेजेस) आणि जेथे मोठे उद्योग व व्यवसाय आहेत, अशा औद्योगिक परिसरामध्ये देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रातील चोऱ्यांना पूर्णपणे लगाम घालता येईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नेवासा जनतेकडून कौतुकाचा वर्षाव
प्रशासकीय दिरंगाईला बाजूला सारून, लोकसहभागाच्या ताकदीवर अवघ्या काही दिवसांत नेवासा शहराचा सुरक्षा स्तर ‘हायटेक’ करणाऱ्या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या या युक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरक्षिततेची नवी पहाट आणल्याबद्दल नेवासातील व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य जनता त्यांचे आभार मानत आहे.