थकीत भविष्य निर्वाह निधीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा ईशारा

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा ग्रामपंचायत अस्तित्वात असताना व त्यानंतर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून अनेक स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नियमितपणे कपात करण्यात आला आहे.मात्र सदर रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत जमा करण्यात आलेली नसल्याने सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा ईशारा मुख्याधिकारी नगरपंचायत यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे
सदर निवेदनात म्हटले आहे की वरील प्रश्नांच्या संदर्भात अनेक वेळा अर्ज, निवेदने व पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले असून त्यांच्या वारसांनाही हक्काची रक्कम मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम न जमा करणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे.
या निवेदनाची प्राप्ती झाल्यापासून आठ दिवसांच्या आत सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत ईपीएफ भविष्य निर्वाह निधी त्यांच्या खात्यावर जमा करून त्याबाबतचा अहवाल लेखी स्वरूपात सादर करण्यात यावा,अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात व आपल्या न्याय्य हक्कासाठी समस्त ईपीएफधारक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनातून उदभवणाऱ्या कोणत्याही जीवितहानीस अथवा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास नेवासा नगरपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी पूर्णपणे जबाबदार राहतील असे ही निवेदनात ईशाऱ्याद्वारे स्पष्ट केले आहे.निवेदनावर सतीश सरोदे,कल्पना रामचंद्र
चक्रनारायण,उल्हासाबाई बहिरु चक्रनारायण,लीना यशुदास साळवे,शशिकला मनोहर चक्रनारायण,वैजता भोसले,सुनीता ताराचंद चव्हाण यांच्या सहया आहेत