**नेवासा: सचिव मनीष घाडगे आत्महत्या प्रकरण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल**

**नेवासा | प्रतिनिधी**
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुल, मुकींदपूर येथील सचिव मनीष अण्णासाहेब घाडगे यांना पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि वैयक्तिक मिळकत संस्थेच्या नावे करण्यासाठी धमकावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनीषा मनीष घाडगे (वय ४०, रा. मुकींदपूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून **सोपान बाजीराव काळे (रा. तेलकुडगाव), अनुराधा उत्तम गोरे (रा. जळके), सुमती साहेबराव घाडगे, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे आणि चेतन चव्हाण (रा. मुकींदपूर)** यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३३९/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे.
**नेमकी घटना काय?**
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ पासून २८ एप्रिल २०२६ दरम्यान आरोपींनी संगनमत करून मनीष अण्णासाहेब घाडगे यांना मानसिक त्रास दिला. मनीष घाडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या मालकीची मालमत्ता संस्थेच्या नावावर करावी, यासाठी आरोपींनी त्यांच्यावर दबाव आणला होता. मागणी पूर्ण न केल्यास खोट्या बदनामीच्या केसेस दाखल करण्याची धमकी वारंवार दिली जात होती. या सततच्या जाचाला कंटाळून मनीष घाडगे यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
**पोलिस तपास सुरू**
सदर गुन्हा दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३७ वाजता दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय घोरपडे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक **सागर सोमनाथ ढिकले** या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुल परिसरातील या घटनेमुळे शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.