मुळा कारखान्यावर माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या सहकार पॅनलची पुन्हा एकहाती सत्ता; विरोधी उमेदवारांचा ६ हजार मतांनी दारुण पराभव

निकालांनंतर नवनिर्वाचित संचालकांनी घेतली शंकरराव गडाखांची भेट; नेवासा तालुक्यात गडाखांचेच वर्चस्व पुन्हा सिद्ध!

**सोनई (प्रतिनिधी):**

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत कारखान्यावर एकहाती सत्ता कायम राखली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या वेळी २१ पैकी १७ जागा बिनविरोध जिंकून गडाख पॅनलने आधीच विजयाचा पाया रचला होता. उर्वरित चार जागांवरही रविवारी सुमारे ६ हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला.

या दणदणीत विजयानंतर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक, ज्येष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले व त्यांचे जंगी स्वागत केले. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख यांचेच एकमुखी वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

विरोधकांना उमेदवारही मिळेनात; चारही जागांवर गडाख पॅनलचा धुव्वा!

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्व जागांवर लढत देण्याचा दावा करणाऱ्या विरोधी पॅनलला प्रत्यक्षात सर्व जागांसाठी उमेदवारही उभे करता आले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक केवळ चार जागांसाठीच मर्यादित राहिली. या चारही जागांवर मतदारांनी गडाख पॅनलवर एकतर्फी विश्वास दाखवत विरोधकांना पूर्णपणे नाकारले.

 

करजगाव गट:या गटातून गडाख पॅनलचे चंद्रकांत भानुदास टेमक (६,८९५ मते) आणि ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६,७२५ मते) यांनी दणदणीत विजय मिळविला. विरोधी उमेदवार नारायण डौले (८४७) व किरण जाधव (१,०४१) यांना पराभवाचा सामना करावा लागला.

महिला राखीव मतदारसंघ: गडाख पॅनलच्या कमल चांगदेव दहिफळे (७,४०१ मते) आणि विमल नारायण सोनवणे (७,१८२ मते) प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. तर विरोधी उमेदवार मीराबाई दिवटे यांना केवळ १,००० मते मिळाली.

यापूर्वीच सोनई, घोडेगाव, खरवंडी, नेवासा, प्रवरासंगम तसेच विविध प्रवर्गांतील एकूण १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

 

धनशक्तीला मतदारांचे चोख उत्तर: गडाख पॅनल

विजयानंतर कार्यकर्त्यांनी आणि विजयी उमेदवारांनी शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. या वेळी गडाख यांच्या नेतृत्वाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

> “हा विजय म्हणजे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पारदर्शक आणि शेतकरीभिमुख नेतृत्वावर सभासदांनी टाकलेला अढळ विश्वास आहे. विरोधी पॅनलकडून धनशक्तीच्या बळावर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र सुज्ञ सभासद मतदारांनी मतदानातून त्याला चोख उत्तर दिले आहे,” अशी भावना विजयी उमेदवारांनी या वेळी व्यक्त केली.

>

चौकट: विरोधी मतांमध्ये लक्षणीय घट; ‘खाजगी’ कारखानदारांना मतदारांनी नाकारले!

> गेल्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या कारखाना निवडणुकीत गडाख विरोधी पॅनलला पडलेल्या मतांच्या तुलनेत, या निवडणुकीत विरोधी पॅनलच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. खासगी कारखानादार असलेल्या विरोधी पॅनल प्रमुखाला कारखान्याच्या सभासद मतदारांनी पूर्णपणे नाकारले असून, तालुक्याची सहकार चळवळ ही गडाखांच्याच हाती सुरक्षित असल्याचा संदेश या निकालातून दिला आहे.

>

**फोटोओळी:** मुळा कारखाना सोनईच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांचा विक्रमी मतांनी विजय होताच कार्यकर्त्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व त्यांच्या उपस्थितीत जोरदार जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!