नेवासा पोलिसांच्या चोख बंदोबस्ताचे कौतुक; पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडून विशेष सन्मान

नेवासा: कामिका एकादशीनिमित्त नेवासा शहरात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लिलया हाताळत नेवासा पोलिसांनी ठेवलेल्या उत्कृष्ट बंदोबस्ताचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अचूक नियोजनाची आणि कर्तव्यतत्परतेची दखल घेत, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
कामिका एकादशीच्या पर्वकाळावर नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात आणि मंदिर परिसरात अत्यंत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे हजारो भाविकांना कोणत्याही अडथळ्याविना आणि सुरक्षित वातावरणात दर्शन घेता आले. पोलिसांनी रात्रंदिवस दिलेल्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग अभंग आणि विश्वस्त मंडळाच्या हस्ते पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
नेवासा पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून पोलीस निरीक्षक दराडे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेली पावले उल्लेखनीय आहेत. या विशेष सन्मानामुळे नेवासा पोलिसांचे मनोबल अधिक उंचावले असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांमधूनही पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीला मोठी दाद दिली जात आहे.