**गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा २० मे रोजी नेवाश्यात प्रथम वर्धापन दिन सोहळा; राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन**

**नेवासा:**
गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि राज्य पदाधिकारी मेळावा बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय (नेवासा ते नेवासा फाटा रोडलगत, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव कोलते पाटील भूषवणार आहेत.
या सोहळ्याचे उद्घाटन विधानसभा सदस्य मा. आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील आणि माजी मृदा व जलसंधारण मंत्री मा. आमदार श्री. शंकरराव गडाख पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी माजी विधानसभा सदस्य मा. आमदार पांडुरंग अभंग, अहिल्यानगरचे उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी मा. श्री. सुधिर पाटील साहेब, नेवाशाचे तहसिलदार मा. श्री. संजय बिरादार साहेब आणि पोलीस निरीक्षक मा. श्री. सागर ढिकले साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस पाटलांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि अथक परिश्रमाने गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने आपले यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे. या आनंददायी क्षणाचे औचित्य साधून वर्धापन दिन सोहळ्यासोबतच राज्याध्यक्ष श्री. शिवाजीराव कोलते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची राज्य आढावा बैठकही मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी केली जाणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील सर्व सन्माननीय राज्य पदाधिकारी, संस्थापक सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव तसेच राज्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती अहिल्यानगर गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.