**चार्ज घेताच अवघ्या काही तासांत वेश्याव्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा; ३ आरोपी जेरबंद, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव**

**नेवासा (प्रतिनिधी):**
नेवासा पोलीस ठाण्याचा अधिकृत पदभार स्वीकारताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हेगारांना आणि अवैध धंदेवाईकांना पहिला आणि मोठा दणका दिला आहे. पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी रस्त्यावर उतरून एका हायप्रोफाइल अवैध धंद्याचा पर्दाफाश केला. हंडीनिमगाव शिवारातील ‘श्री हॉटेल / लॉजिंग’ वर धाडसी छापा टाकून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे नेवासा तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून या कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
**गुप्त माहितीच्या आधारे कार्यवाही **
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार दिनांक १२.०६.२०२६ रोजी दुपारी १६.३५ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना एक विश्वासार्ह गुप्त माहिती मिळाली होती. हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेल / लॉजिंग येथे काही महिलांना डांबून, त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच, दराडे यांनी कोणताही वेळ न घालवता तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
**नियोजित सापळा अन् छापा!**
पोलीस निरीक्षक दराडे यांनी स्वतः पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, पंचांसह सदर लॉजवर अत्यंत शिताफीने छापा टाकला. या छाप्यात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या ३ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
**अटक करण्यात आलेले आरोपी:**
१) **मल्हारी शंकर नगरे** (वय ३४ वर्षे, धंदा: मजुरी, रा. खंडोबा मंदिर खुपटी रोड, नेवासा)
२) **सतिश दिलीप पेटे** (वय ३० वर्षे, धंदा: मजुरी, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर)
३) **लखन राजेंद्र भणगे** (वय २५ वर्षे, रा. हंडीनिमगाव, ता. नेवासा – मालक)
**गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू**
याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदार भारती पवार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(३) सह स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
**अवैध धंदे चालवणाऱ्यांना दराडेंचा इशारा**
> “नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल आणि ही मोहीम सातत्याने चालू राहील.”
> — **प्रताप दराडे (पोलीस निरीक्षक, नेवासा)**
>
**कारवाई करणारे पोलीस पथक:**
सदरची धडक कारवाई अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्माका सुदर्शन, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ वाकचौरे आणि शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोउपनि विकास पाटील, पोहेकॉ अजय साठे, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ श्रीनाथ गवळी, मपोकॉ भारती पवार आणि मपोकॉ गिता पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
**पहिल्यांदाच असा ‘ऑन द स्पॉट’ ॲक्शन मोड!**
नवे पोलीस अधिकारी आल्यानंतर सामान्यतः परिस्थिती समजून घेण्यास वेळ घेतात. परंतु, चार्ज घेताच काही तासांतच पोलीस निरीक्षक दराडे थेट रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसल्याने नेवासाकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. “असा सिंघम अधिकारीच तालुक्याला हवा होता,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.