पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरूंची धडाकेबाज कारवाई; शनिशिंगणापूर परिसरात अवैध शस्त्रसह तरुण गजाआड

**नेवासा/शेवगाव (प्रतिनिधी):**
अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शनिशिंगणापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोनई-शनिशिंगणापूर रोडवर एका २३ वर्षीय तरुणाला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

**राजगुरूंच्या सूचनेनुसार रचला सापळा**
शेवगाव विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून निरज राजगुरू यांनी अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे पथक गस्तीवर असताना, सोनई-शनिशिंगणापूर रोडवरील चारी नंबर ४ परिसरात एक तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती राजगुरू यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले.
**कट्टा आणि काडतुसे जप्त**
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित तरुण कृष्णा शिवाजी डावखर (वय २३, रा. शनिशिंगणापूर) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३० हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व ऐवज जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
**गुन्हेगारांचे धाबे दणाणले**
ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली **पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू** यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वी केली. या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, राजगुरू यांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पथकात पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, रमेश लबडे, सागर शेजुळ, मृत्युंजय मोरे, रविकांत गर्जे, भगवान वाघमोडे आणि सायबर सेलचे अरुण सांगळे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एन. कारखेले करत आहेत.