‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २७ मार्च रोजी आयोजन

मुंबई, दि. २१  : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ऑस्कर’ अकॅडमी पुरस्काराने गौरविलेल्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी ‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये गीत, संगीत, नृत्य, दृकश्राव्य सादरीकरण आणि निवेदनाच्या माध्यमातून भानू अथैय्या यांच्या कलाप्रवासाचा व त्यांच्या यशोगाथेचा उलगडा करण्यात येणार आहे.

भानू अथैय्या यांनी आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेशभूषा रचना केली असून, त्यांच्या कामात भारतीय परंपरा, सूक्ष्म अभ्यास आणि ऐतिहासिक अचूकता यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. सन १९८३ मध्ये “गांधी” या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला होता. ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या. त्यांच्या कलेमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

या कार्यक्रमात उर्मिला कानेटकर, वैदेही परशुरामी, मानसी नाईक, भार्गवी चिरमुले, किन्नरी दामा, सुकन्या काळन, अभिनय बेर्डे, नकुल घाणेकर, अभिजित ठाकूर तसेच मंगला खाडिलकर यांसारख्या कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे व मिनल भिके यांनी केले असून, संहिता लेखन डॉ. सुवर्णा यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री  ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, मुंबई व परिसरातील नागरिक, कलाकार व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!