तरुण भररस्त्यात स्टॅच्यूसारखा उभा, कोणालाच प्रतिसाद देईना; झॉम्बी ड्रगची चर्चा, नेटकरी चिंतेत

वर्दळीच्या रस्त्यावर एक तरुण निश्चल उभा होता. तो जराही हालचाल करत नव्हता. आपल्याच धुंदीत तो एखाद्या स्टॅच्यूसारखा उभा होता. त्याची अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

बंगळुरु: रहदारीच्या रस्त्यावर एक तरुण तब्बल दोन तास निश्चल अवस्थेत उभा असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या तरुणानं अमली पदार्थांचं सेवन केलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी गेल्या महिन्यात अशाच प्रकारची घटना चंदिगढमध्ये घडली होती. ब्लिंकिट कंपनीचा डिलिव्हरी बॉय कित्येक तास निश्चल अवस्थेत उभा होता. त्यावेळी झॉम्बी ड्रग्जची चर्चा झाली होती. आता बंगळुरुतील तरुणाचा व्हिडीओ समोर येताच तीच चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

एकाच जागी स्टॅच्यूसारखा उभ्या असलेल्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ बंगळुरुच्या बागालुर परिसरातील आहे. व्हिडीओत एक तरुण टी शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे. तरुण एकाच जागी बराच वेळ उभा आहे. आसपासच्या लोकांना तो कोणताही प्रतिसाद देत नाही. एकाच स्थितीत तो बराच वेळ उभा आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर स्टॅच्यू सारखा उभ्या असलेल्या तरुणाचा व्हिडीओ अनेकांनी एक्सवर (आधीचं ट्विटर) शेअर केला. अतिशय धोकादायक असलेलं झॉम्बी ड्रग शहरात पोहोचल्याची चर्चा सुरु झाली. या तरुणानं झायलझीनचं सेवन केलं असावं, असा अंदाज काहींनी वर्तवला. व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळे दावे केले. काहींनी याबद्दल चिंता व्यक्त केली.

सोशल मीडियावर अनेकांकडून व्हिडीओ शेअर होत असताना कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेनं यावर भाष्य केलेलं नाही. या तरुणानं ड्रग्ज घेतलं आहे का, त्याची अशी अवस्था अमली पदार्थांमुळे झाली आहे का, यावर प्रशासनानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा तरुण नेमका कोण आहे, त्याची अशी अवस्था कशामुळे झाली, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ बराच व्हायरल झाल्यानंतर बंगळुरुतील येताहंका पोलीस ठाण्यानं या पोस्टबद्दल अधिकची माहिती मागितली. आम्ही या प्रकरणाची माहिती घेऊ, सविस्तर तपास करु, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं. प्रशासनानं अद्याप तरी याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. व्हिडीओची खातरजमा न करता कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका, असं आवाहन अधिकाऱ्यांनी लोकांना केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *