प्लॉट विक्रीच्या वादातून संसाराची राखरांगोळी, पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली; संतापात नवऱ्याला संपवलं

छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे.

 

एका जमिनीच्या प्लॉटचा व्यवहार कुटुंबासाठी इतका महागात पडेल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील घटनांद्रा येथे संसाराची राखरांगोळी करणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरचा प्लॉट विकण्यावरून झालेल्या वादातून पत्नीने रागाच्या भरात आपल्याच पतीचा भीषण अंत केला. या कृत्यापूर्वी आरोपी पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना असहाय्य केलं आणि त्यानंतर जड वस्तूने प्रहार करून गळा आवळून त्यांचा जीव घेतला.

प्लॉट विक्रीस पत्नीचा विरोध

जेबास तालीब पठाण (वय ४६) असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. तर रशिदाबी जेबास पठाण (रा. घटनांद्रा) असं आरोपी पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत जेबास पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून स्टोव्ह, गॅस आणि मिक्सर दुरुस्तीचा छोटा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मोठ्या कष्टाने आणि पै-पै वाचवून त्यांनी घटनांद्रा गावात एक प्लॉट खरेदी केला होता. घरच्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी जेबास यांना हा प्लॉट विकायचा होता, मात्र त्यांची पत्नी रशिदाबी हिचा या विक्रीला टोकाचा विरोध होता. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून पती-पत्नीमध्ये सतत कटकटी सुरू होत्या.

मारण्याधी डोळ्यात मिरचीची पूड

सोमवारी २३ मार्च रोजी रात्री जेबास कामावरून घरी परतल्यानंतर पुन्हा एकदा प्लॉटच्या विक्रीचा विषय निघाला. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, रशिदाबीने संतापाच्या भरात घरातील तिखट मिरचीची पूड जेबास यांच्या डोळ्यात फेकली. काही समजण्यापूर्वीच तिने त्यांच्या डोक्यावर पाठीमागून जोरदार प्रहार केला. जेबास जखमी होऊन जमिनीवर कोसळताच रशिदाबीने त्यांचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. हा सर्व प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून पहाटे ही घटना उघडकीस आली.

पुतण्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

या प्रकरणाची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत जेबास यांचा पुतण्या रिजवान सांडू पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रशिदाबी पठाणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या भीषण हत्याकांडात अन्य कोणाची चिथावणी किंवा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *