जर कोणीही असे व्हिडिओ सोशल मीडिया, न्यूज पोर्टल किंवा इन्स्टाग्रामवर प्रसारित केले, तर संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अहिल्यानगर: भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कठोर पाऊल उचललं आहे. कोपरगाव शहरात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करत एकाचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन्स आणि युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. मात्र, या गुन्ह्यातील पीडित महिलांची ओळख पटेल असे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. २५ मार्च २०२६ रोजी कोपरगावमधील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे (रा. कोपरगाव) याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केले होते. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून राहुल शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) याने पाठवल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे, योगेशला हे व्हिडिओ त्याचा माजलगाव (जि. बीड) येथील मित्र संदीप गर्जे याने पाठवले होते.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल शिंदे, योगेश आढाव आणि संदीप गर्जे या तिघांविरुद्ध बी.एन.एस. कलम २९४ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना बेड्या ठोकल्या असून, तिसरा आरोपी संदीप गर्जे याचा शोध सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात अनेक महिला पीडित असण्याची शक्यता आहे. पीडितेची किंवा तिच्या कुटुंबाची ओळख पटेल असे व्हिडिओ कोणाकडेही असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत, असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.