पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार; बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष

इराण आणि अमेरिका, इस्त्रायलच्या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचा (Petrol-Diesel) तुटवडा निर्माण झाल्याची केवळ अफवा आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईच्या अफवा पसरवण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्यात. परिणामी अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेडसह परभणीमध्ये इंधनसाठ्यावर मर्यादा लावण्यात आल्यात. युद्धामुळे पेट्रोल, डिझेलचा साठा संपेल अशा अफवा सोशल मिडीयावरून पसरवण्यात येताय. त्यामुळे भीतीपोटी नागरिक अतिरिक्त साठाही करून ठेवत आहेत.
आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. आज सायंकाळी 6.30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.
*देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?*
मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो केंद्र सरकारने वारंवार सांगितले आहे. आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे तरी लोक रांगा लावून जास्तीचा पेट्रोल भरून घेत आहेत. प्रत्येकाला जेवढा पेट्रोल डिझेल दर महिन्याला लागतो तेवढीच त्यांनी खरेदी करावी अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा कोणी काळाबाजार करणार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
*देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही* –
काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असं मंत्रालयाने म्हटलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही.